बेळगाव : बहुमजली इमारतींना नोटीस; : प्लिंथ लेवल प्रमाणपत्र व बांधकाम नियम

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : प्लिंथ लेवल प्रमाणपत्र न घेतलेल्या व बांधकाम नियमांचे उल्लंघन केलेल्या शहरातील 20 बहुमजली इमारतींना महापालिकेने नोटीस बजावली आहे. बेळगाव शहरातील तीन किंवा त्यापेक्षा जास्त मजल्याच्या इमारतींना महापालिकेने प्लिंथ लेवल प्रमाणपत्र सक्तीचे केले आहे. त्याची अंमलबजावणीही महापालिकेने सुरू केली आहे. महापालिकेने गेल्या काही दिवसांत बांधकाम परवाना दिलेल्या इमारतींची नगररचना बहुमजली इमारतींची विभागाने तयार केली आहे. त्या इमारतींच्या बांधकामस्थळी नगररचना विभागाचे अभियंते भेट देत आहेत.
इमारतीचे प्लिंथ लेवलचे बांधकाम पूर्ण होऊनही प्रमाणपत्र न घेतलेल्यांची माहिती घेतली जात आहे. प्लिंथ लेवलचे बांधकाम आराखड्यानुसार झाले आहे का, याची चाचपणीही केली जात आहे. शहरातील अशा 50 टक्के इमारतींची पाहणी पूर्ण झाली आहे. त्यात 20 इमारतींच्या मालकांकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे व त्यांनी प्रमाणपत्र न घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच त्यांना नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यामुळे आता इमारतमालकांना नगररचना विभागाशी संपर्क साधून मंजूर आराखड्याप्रमाणे प्लिंथ व अन्य बांधकाम किंवा आराखड्यात बदल करुन घ्यावा लागणार आहे.
बेळगावातील 2400 चौरस फुटापेक्षा जास्त आकाराच्या जागेतील इमारतीचा बांधकाम परवाना नगररचना विभागाकडून दिला जातो. त्यापेक्षा कमी आकाराच्या जागेतील बांधकाम परवाना विभागीय कार्यालयाकडून दिला जातो. महापालिकेकडे ऑनलाईन अर्ज दाखल करताना नियोजित इमारतीचा आराखडाही सादर करावा लागतो. बांधकाम नियमानुसार आराखडा असेल तरच तो मंजूर केला जातो. आराखड्यानुसारच इमारतीचे बांधकाम करावे लागते, पण बेळगाव शहरात सर्रास मंजूर आराखडा व बांधकाम नियमांचे उल्लंघन केले जाते. त्यामुळेच आता बांधकाम नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात बहुमजली इमारतींवर कारवाई केली जात आहे.