HDK-BSY-Siddaramaiah.jpg | ...तर मी राजकारणातून संन्यास घेईन; कर्नाटक : सिद्धरामय्यांचे कुमारस्वामींना आव्हान | belgaum news | belgavkar बेळगावकर

...तर मी राजकारणातून संन्यास घेईन; कर्नाटक : सिद्धरामय्यांचे कुमारस्वामींना आव्हान

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटक - बंगळूर : प्राप्तिकर विभागाने (Income Tax) माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पांचे स्वीय सहाय्यकावर छापे टाकले होते. यामुळे येडियुरप्पा अडचणीत आल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर येडियुरप्पा आणि काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची गुप्त भेट झाल्याचा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केला आहे. यावर सिद्धरामय्यांनी कुमारस्वामींना आव्हान दिले आहे. सिद्धरामय्या यांनी कुमारस्वामींचे आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, माझी अशी कोणती गुप्त भेट झाल्याचे सिद्ध केल्यास मी राजकारणातून संन्यास घेईन. मी येडियुरप्पांच्या वाढदिवशी 27 फेब्रुवारी 2020 रोजी एकदा भेटलो होतो.
मुख्यमंत्री अथवा विरोधी पक्षनेता म्हणून मी त्यांना भेटलो असून, व्यक्तिगतरीत्या आजपर्यंत भेटलो नाही. कोरोना झाल्यानंतर आम्ही दोघेही एकाच रुग्णालयात दाखल होतो. तेव्हाही आमची भेट झाली नव्हती. कुमारस्वामी धादांत खोटे बोलत आहेत. धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी मोठा गौप्यस्फोट करून राजकीय भूकंप घडवला आहे. येडियुरप्पा आणि सिद्धरामय्या यांची गुप्त भेट झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, येडियुरप्पा आणि सिद्धरामय्या यांची गुप्त भेट झाली होती. या भेटीची माहिती भाजप नेतृत्वाला मिळताच येडियुरप्पांच्या निकटवर्तीयावर छापे टाकण्यात आले. येडियुरप्पांना नियंत्रणात ठेवण्यासाठी नेतृत्वाने ही खेळी खेळली. या भेटीची माहिती देण्यासाठी सिद्धरामय्या हे दिल्लीला गेले होते. त्यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांना माहिती दिली होती.
मागील काही दिवसांपासून येडियुरप्पा हे भाजपला अडचणीत आणण्याची तयारी करीत असल्याची चर्चा आहे. भाजपने नेतृत्वाने त्यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांना सुरवातीला मंत्रिमंडळात स्थान दिले नव्हते. नंतर राज्यात हनगळ आणि सिंदगी या विधानसभा पोटनिवडणुकांसाठी प्रभारी म्हणून विजयेंद्र यांचा समावेश करण्यात आला नव्हता. याबद्दल येडियुरप्पांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर लगेचच विजयेंद्र यांनी प्रभारी करण्यात आले होते. येडियुरप्पांच्या राज्य यात्रेलाही भाजपने विरोध केला आहे. आता येडियुरप्पांच्या पीएवर छापे पडल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. येडियुरप्पांचा आवाज दाबण्यासाठीच हे छापे टाकण्यात आल्याचे कुमारस्वामी यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. कुमारस्वामी म्हणाले होते की, येडियुरप्पा आणि त्यांचे पुत्र विजयेंद्र यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी हे छापे टाकण्यात आले. ते दोघे काही तरी करतील, अशी भीती भाजप नेतृत्वाला आहे. यामुळे त्यांना रोखण्यासाठी भाजप नेतृत्वाने हे पाऊल उचलले.
या पार्श्वभूमीवर येडियुरप्पा आणि काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची गुप्त भेट झाल्याचा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केला आहे. यावर येडियुरप्पांनी अखेर खुलासा केला आहे. येडियुरप्पा म्हणाले की, मी कधीही माझा विश्वास असलेल्या विचारसरणीशी तडजोड केलेली नाही. कर्नाटकात पुन्हा भाजपला सत्तेत आणणे हाच माझा एकमेव उद्देश आहे. माझ्या वाढदिवशी 27 फेब्रुवारीला आम्ही भेटलो होतो. हा अपवाद वगळता मी कधीही विरोधी पक्षनेत्यांना व्यक्तिगतरीत्या भेटलो नाही. अशा प्रकारच्या गुप्त भेटींची मला गरज नाही. केवळ राज्यात भाजपला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी मी पक्षात आहे. त्यामुळे भेटीच्या बातम्या या खऱ्या नसून, निरर्थक आहेत.