HDK-BSY-Siddaramaiah.jpg | कर्नाटकात राजकीय भूकंप! येडियुरप्पा अन् सिद्धरामय्यांची गुप्त भेट | belgaum news | belgavkar बेळगावकर

कर्नाटकात राजकीय भूकंप! येडियुरप्पा अन् सिद्धरामय्यांची गुप्त भेट

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटक - बंगळूर : प्राप्तिकर विभागाने (Income Tax) माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पांचे स्वीय सहाय्यकावर छापे टाकले होते. यामुळे येडियुरप्पा अडचणीत आल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर येडियुरप्पा आणि काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची गुप्त भेट झाल्याचा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांनी केला आहे. यामुळे राज्यात राजकीय भूकंप आला आहे.
मागील काही दिवसांपासून येडियुरप्पा हे भाजपला अडचणीत आणण्याची तयारी करीत असल्याची चर्चा आहे. भाजपने नेतृत्वाने त्यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांना सुरवातीला मंत्रिमंडळात स्थान दिले नव्हते. नंतर राज्यात हनगळ आणि सिंदगी या विधानसभा पोटनिवडणुकांसाठी प्रभारी म्हणून विजयेंद्र यांचा समावेश करण्यात आला नव्हता. याबद्दल येडियुरप्पांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर लगेचच विजयेंद्र यांनी प्रभारी करण्यात आले होते. येडियुरप्पांच्या राज्य यात्रेलाही भाजपने विरोध केला आहे. आता येडियुरप्पांच्या पीएवर छापे पडल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी मोठा गौप्यस्फोट करून राजकीय भूकंप घडवला आहे. येडियुरप्पा आणि सिद्धरामय्या यांची गुप्त भेट झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, येडियुरप्पा आणि सिद्धरामय्या यांची गुप्त भेट झाली होती. या भेटीची माहिती भाजप नेतृत्वाला मिळताच येडियुरप्पांच्या निकटवर्तीयावर छापे टाकण्यात आले. येडियुरप्पांना नियंत्रणात ठेवण्यासाठी नेतृत्वाने ही खेळी खेळली. या भेटीची माहिती देण्यासाठी सिद्धरामय्या हे दिल्लीला गेले होते. त्यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांना माहिती दिली होती. येडियुरप्पांचा आवाज दाबण्यासाठीच हे छापे टाकण्यात आल्याचे कुमारस्वामी यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. कुमारस्वामी म्हणाले होते की, येडियुरप्पा आणि त्यांचे पुत्र विजयेंद्र यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी हे छापे टाकण्यात आले. ते दोघे काही तरी करतील, अशी भीती भाजप नेतृत्वाला आहे. यामुळे त्यांना रोखण्यासाठी भाजप नेतृत्वाने हे पाऊल उचलले.
जलसंपदा विभागातील निविदा वाटपात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी प्राप्तिकर विभागाने मध्यस्थ, कंत्राटदार आणि कंपन्यांवर छापे टाकले आहेत. प्राप्तिकर विभागाच्या बंगळूर आणि गोवा कार्यालयातील तीनशेहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हे छापे घातले. जलसंपदा विभागातील सुमारे 25 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराबद्दल छापे घालण्यात आले. जलसंपदा विभागाची कंत्राटे देताना मोठा भ्रष्टाचार होत आहे. यात येडियुरप्पांचे पीए एम. आर. उमेश हे मुख्य सूत्रधार असल्याचा संशय आहे. उमेश यांनी या माध्यमातून अडीच ते तीन हजार कोटी रुपयांचे कमिशन गोळा केल्याचाही संशय आहे. उमेश यांच्यावरील छाप्याने येडियुरप्पा हे नाराज झाले आहेत. उमेश यांच्यासह काही कंत्राटदार, चार्टर्ड अकाउंटंट, बांधकाम साहित्याचे व्यापारी आणि येडियुरप्पांचे पुत्र बी.विजयेंद्र यांच्या जवळच्या काही व्यक्तींवर छापे घालण्यात आले. बंगळूरसह, बागलकोट, तुमकूर येथे छापे घालण्यात आले. यात कागदपत्रे आणि पेन ड्राईव्ह जप्त करण्यात आले आहेत.