बुस्टर डोस घ्यावा लागणार? आरोग्य मंत्रालयाचे उत्तर आले

belgavkar.com | belgaum | belgavkar

60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना तिसऱ्यांदा कोरोना लस घ्यावी लागणार असल्याचा सल्ला डब्ल्यूएचओच्या समितीने दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना लसीचा (Corona Vaccine) बुस्टर डोस घ्यावा लागेल का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला होता. आधीच कोरोना लसीचा पहिला आणि दुसरा डोस मिळण्यासाठी एवढा त्रास, हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. यामुळे बुस्टर डोससाठी (Corona Booster Dose) पुन्हा तेच करावे लागण्याची शक्यता होती. यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे उत्तर आले आहे.
दोन डोस घेतलेल्यांना पुन्हा बुस्टर डोस देण्याबाबत अद्याप कोणत्याही एक्स्पर्टचा सल्ला आलेला नाही. यामुळे यावर अद्याप कोणतीही चर्चा झालेली नसून विचारही करण्यात आला नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. तसेच या महिन्यात कोरोना लसीचे 28 कोटी डोस उपलब्ध केले जाणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. काही संशोधनांमध्ये कोरोनाची बदलती रूपे आणि त्याची वाढती ताकद लक्षात घेऊन कोरोनाचा तिसरा बुस्टर डोस देण्याचा सल्ला देण्यात आला होता.
कोरोनाची तिसरी, चौथी लाट आणि डेल्टा सारखे व्हेरिअंट थोपवायचे असतील तर बुस्टर डोस देऊन लोकांना संरक्षण देण्याचे सांगण्यात आले होते. काही देशांत बुस्टर डोसमुळे किती संरक्षण मिळते हे पाहण्यासाठी लोकांना तिसरा डोसही देऊन पाहण्यात आले होते. आरोग्य मंत्रालयानुसार या महिन्यात जगातील पहिली डीएनए लस झायको-वी चे 60 लाख डोस दिले जाणार आहेत. ही तीन डोसची लस आहे. दुसरा डोस 28 दिवसांनी आणि तिसरा डोस 56 दिवसांनी दिला जाणार आहे. ऑक्टोबरमध्ये 22 कोटी डोस हे कोव्हिशिल्ड आणि 6 कोटी डोस हे कोव्हॅक्सिनचे दिले जाणार आहेत.