मोहोळ शिवसैनिकांच्या दुहेरी खून खटल्यातील 5 जणांना केली कर्नाटकातून अटक !

मोहोळ शिवसैनिकांच्या दुहेरी खून खटल्यातील 5 जणांना केली कर्नाटकातून अटक !

belgavkar.com | belgaum | belgavkar

सोलापूर : सोलापुरातील मोहोळमध्ये शिवसैनिकांची दुहेरी हत्या केल्याप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. शिवसैनिकांच्या बाईकवर टेम्पो घालून अपघात असल्याचं भासवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हत्या करण्यात आली होती. कर्नाटक राज्यात लपून बसलेल्या 5 संशयित आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. मोहोळ येथील क्षीरसागर - सरवदे दुहेरी खून प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्यात मोहोळ पोलिसांना यश आले. आळंद (कर्नाटक) परिसरातून पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. संतोष जनार्दन सुरवसे, रोहित ऊर्फ अण्णा फडतरे, पिंटू जनार्दन सुरवसे, आकाश ऊर्फ गोटू नामदेव बरकडे, संदीप ऊर्फ गोट्या सरवदे (सर्वजण रा. मोहोळ, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, 14 जुलै रोजी मोहोळ येथील सतीश क्षीरसागर आणि विजय सरवदे या शिवसैनिकांच्या दुचाकीवर संशयितांनी टेम्पो घालून घातपाताचा बनाव केला होता. यामध्ये सतीश क्षीरसागर हे जागीच ठार झाले होते, तर विजय सरवदे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणात मोहोळ पोलिसांनी भैय्या अस्वले यास ताब्यात घेऊन सुरवातीला चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान आणखी दोघांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपींची संख्या सहा इतकी झाली होती. मात्र भैय्या अस्वले वगळता उर्वरित पाच आरोपी पोलिसांच्या हाती लागले नव्हते. त्यामुळे आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी मृताच्या नातेवाइकांकडून पोलिस प्रशासनासमोर आक्रोश सुरू होता.
मोहोळ पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस कर्मचारी सुरवातीपासूनच फरार आरोपींच्या मागावर होते. आरोपींच्या मोबाईल लोकेशनवर ते सतत नजर ठेवून होते. दरम्यान, फरार आरोपी कर्नाटक राज्यातील आळंद (जि. गूलबर्गा) परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी यापूर्वी त्या ठिकाणी जाऊन आरोपींचा शोध घेतला होता; मात्र ते मिळून आले नव्हते. दरम्यान, पुन्हा एकदा आरोपी आळंद परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल शरद ढावरे, पो. कॉ. गणेश दळवी, पांडुरंग जगताप, हरीश थोरात यांच्या पथकाने सोमवारी (2 ऑगस्ट) रोजी हिरोळी (ता. आळंद, जि. गुलबर्गा, कर्नाटक) येथे साध्या वेशात सापळा लावला होता. सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान या खून प्रकरणातील संशयित फरार आरोपी संतोष जनार्दन सुरवसे, रोहित ऊर्फ अण्णा फडतरे, पिंटू जनार्दन सुरवसे, आकाश ऊर्फ गोटू नामदेव बरकडे, संदीप ऊर्फ गोट्या सरवदे (सर्वजण रा. मोहोळ, जि. सोलापूर) त्या ठिकाणी आले. या वेळी पोलिस पथकाने गराडा घालून मोठ्या शिताफीने त्यांना पकडले.
रात्री पावणेअकरा वाजता सर्व आरोपींना मोहोळ पोलिस ठाण्यात आणण्यात आले. 3 ऑगस्ट रोजी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. बनावट मतदार नोंदणी व रमाई घरकुल आवास योजनेचे प्रस्ताव गायब प्रकरणी आंदोलन केल्याने आरोपींनी संगनमताने कट करून हे हत्याकांड घडवून आणल्याचे सांगण्यात येते. मात्र मुख्य आरोपींच्या अटकेमुळे या खून प्रकरणात आणखी कोणते कारण आहे का? याचा उलगडा होणार आहे. मोहोळ पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाईबद्दल पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलिस निरीक्षक अशोक सायकर व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

मोहोळ शिवसैनिकांच्या दुहेरी खून खटल्यातील 5 जणांना केली कर्नाटकातून अटक !

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm