koyna-dam.jpg | चेरापुंजीला मागे टाकत कोयना धरण क्षेत्रात 'रेकॉर्ड ब्रेक' पाऊस | belgaum news | belgavkar बेळगावकर

चेरापुंजीला मागे टाकत कोयना धरण क्षेत्रात 'रेकॉर्ड ब्रेक' पाऊस

belgavkar.com | belgaum | belgavkar

कोयनानगर (सातारा) : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात ढगफुटी सदृश्य पडत असलेल्या पावसामुळे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात 24 तासात तब्बल 10 टीएमसीने वाढ झाली आहे. पाणलोट क्षेत्रातील सर्वदूर ठिकाणी उच्चांकी पाऊस पडत आहे. नवजा, महाबळेश्वर व वलवण या पाणलोट क्षेत्रात 400 मिमी पेक्षा जादा या रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणात 66 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा रेषो असाच राहिला, तर धरणाच्या सहा वक्र दरवाज्याला पाणी टेकण्यास सज्ज झाले आहे. यामुळे धरणाची जलपातळी नियंत्रित करण्यसाठी धरणाचे वक्र दरवाजे उघडण्याशिवाय कोयना प्रशासनासमोर पर्याय नसणार असल्याचे चित्र आहे.
मुसळधार पावसासाठी प्रसिद्ध असणाऱ्या चेरापुंजीला मागे टाकत कोयना पाणलोट क्षेत्रात धुवांधार पाऊस पडत आहे. पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे 345 मिमी नवजा 445 मिमी महाबळेश्वर येथे 445 मिमी, तर वलवण या ठिकाणी 458 मिमी रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्या त झपाट्याने वाढ झाली आहे. पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 1 लाख 73 हजार 933 क्यूसेस झाली असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात चोवीस तासात 11 टीएमसीने वाढ झाली आहे. धरणाची जलपातळी 2126.3 फूट झाली असून धरणात 66.75 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
कोयना पाणलोट क्षेत्रात ढगफुटी सदृश्य पाऊस पडत आहे. यामुळे नेचल ते हेळवाक या राज्य मार्गावरील रस्त्यावर पाणी आल्याने कराड-चिपळूण या राज्य मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. कोयना धरणात 73.50 टीएमसी पाणीसाठा झाल्यावर धरणाच्या 6 वक्र दरवाज्याला पाणी टेकते. ही लेव्हल येण्यासाठी केवळ 6 टीएमसी पाणीसाठ्याची गरज आहे. पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचे धुमशान सुरूच आहे. पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसाचा रेषो बघितला, तर ही लेव्हल दिवसभरात पूर्ण होवू शकते. यामुळे वाढत जाणारी जलपातळी नियंत्रित करण्यसाठी धरणाचे दरवाजे उघडणे हे क्रमप्राप्त होणार आहे.
कोयना धरणामध्ये सांडवा पातळीस पाणीसाठा निर्माण झाल्यानंतर सांडव्याद्वारे विसर्ग सुरू होण्याची शक्यता असल्याने कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे - कोयना धरण व्यवस्थापन