lockdown-parties-in-farm-shet-kangrali-khurd-village-belgaum-apmc-police-party-lockdown-202105.jpg | बेळगाव : लाॅकडाऊन | शेत-शिवारातील पार्ट्या आणि जुगारांना आवरा | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : लाॅकडाऊन | शेत-शिवारातील पार्ट्या आणि जुगारांना आवरा

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : कंग्राळी खुर्द येथील शेतवडीत सध्या मद्यपान, पार्ट्या, जुगार अशा प्रकारांना ऊत आला आहे. यामुळे शेतकरीवर्ग हैराण झाला आहे. विशेषकरून महिला मजूर भीतीने वावरत आहेत. शेतातून दारूच्या बाटल्या फोडल्या जात असून काम करताना इजा होत आहेत. यासाठी अशा लोकांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी कंग्राळी ग्रामपंचायतीने केली आहे. या संदर्भात एपीएमसी पोलीस स्थानकाचे निरीक्षक दिलीपकुमार यांना निवेदन देण्यात आले.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने सध्या लाॅकडाऊन आणि कोरोना कर्फ्यू जारी केला आहे. मात्र, काही बेजबाबदार लोक घरी थांबण्याऐवजी कंग्राळीखुर्द गावच्या शिवारात झाडाखाली आंबराई, नदीकाठी ओल्या पार्ट्याचं आयोजन करत आहेत. त्या ठिकाणी मद्यपान करून दारुच्या बाटल्या शेतवडीत टाकून देत आहेत. दिवसभर मद्यपान करून जुगारचे डाव, सिगारेट, गुटखा खात शेतात वेळ काढत आहेत. यामुळे शेताकडे कामासाठी गेलेले शेतकरी विशेषकरून महिला मजूर यांना त्रास होत आहे.
एखाद्या शेतकऱ्याने हुसकावण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याशी वाद घातला जात आहे, असे निवेदनात म्हटले आहे. या वेळी अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, सदस्य रमेश कांबळे, वैजनाथ बेन्नाळकर, विनायक कम्मार, परशराम पाटील, राकेश पाटील, प्रशांत पाटील, धनाजी तुळसकर, कमला पाटील आदी उपस्थित होते.