belgaum-doctor-who-sent-a-corpse-to-the-home-of-the-infected-person-athani-and-gokak-corona-202105.jpg | बेळगाव : भयंकर! आधी जिवंत व्यक्तीला केलं मृत घोषित, कुटुंबाला सोपवला भलताच मृतदेह CoronaVirus... | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : भयंकर! आधी जिवंत व्यक्तीला केलं मृत घोषित, कुटुंबाला सोपवला भलताच मृतदेह CoronaVirus...

belgavkar.com | belgaum | belgavkar

जिवंत व्यक्ती मृत दाखवत दुसराच मृतदेह ताब्यात दिला

बेळगाव : सर्वत्र कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. अनेक देश कोरोना संकटाचा सामना करत आहेत. यावर मात करण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत बेळगावच्या रुग्णसंख्येत हजारोने वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. याच दरम्यान काही धक्कादायक घटना समोर येत आहेत. आधी जिवंत व्यक्तीला मृत घोषित केलं त्यानंतर कुटुंबाला भलताच मृतदेह सोपवल्याची भयंकर घटना समोर आली आहे. एका कुटुंबाला कोरोनामुळे घरातील सदस्याचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. तसेच त्यानंतर मृतदेहही पाठवण्यात आला.
कोरोना संसर्गामुळे बेळगाव शहरातील एका रुग्णालयात दाखल केलेल्या एका व्यक्तीच्या कुटुंबीयांकडे भलताच मृतदेह सुपूर्द करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. महत्त्वाचे म्हणजे मूळ रुग्ण जिवंत असताना हा प्रकार घडला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी डॉक्टरांना घेराव घातला. अथणी तालुक्यातील एका व्यक्तीला (कागवाडीत मोळे गावातील मायप्पा सत्यप्पा हल्लोळी, वय 82) कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याला 1 मे रोजी बेळगाव शहरातील एका रुग्णालयात (शहापूरातील व्हेनस मल्टी सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटल) दाखल करण्यात आले. 2 मे रविवारी डॉक्टरांनी त्या रुग्णाच्या नातेवाईकांना बोलावून त्यांच्या ताब्यात, एक मृतदेह दिला.
मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळलेला (हा मृतदेह गोकाक येथील मायप्पा मावरकर, वय 71 यांचा होता) असल्यामुळे नातेवाईकांना चेहरा पाहता आला नाही. त्यानंतर काही नातेवाइकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कारही कोरोना नियमानुसार झाले. त्यानंतर सोमवारी दुपारी त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयातून पुन्हा फोन गेला. फोनवर त्यांच्याशी चक्क त्यांचा रुग्ण बोलत होता. आनंद झालेल्या नातेवाईकांनी पुन्हा बेळगावकडे धाव घेतली आणि रुग्णाला भेटून खात्री केल्यानंतर डॉक्टरांना घेराव घातला. डॉक्टरांनी नंतर कबुली दिली. नातेवाईकांची माफी मागून भलत्याच व्यक्तीचा मृतदेह ताब्यात दिल्याची माहिती दिली. तरी नातेवाईक मानण्यास तयार नव्हते. त्यामुळे रुग्णालयात काही काळ गोंधळ उडाला.
ज्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार झाले. त्याच्या मुलाने पोलिस स्थानकामध्ये तक्रार नोंदवली आहे. अंत्यसंस्कार अथणी तालुक्यात झाल्याने तक्रार कागवाड पोलिसांत नोंदवण्यात आली. त्यानंतर अथणीचे पोलिस उपअधीक्षक एस. पी. गिरीश यांच्या उपस्थितीत त्या व्यक्तीच्या अस्थी त्याच्या मुलाच्या ताब्यात देण्यात आल्या. पोलिस अधिक तपास करत आहेत. दोन्ही रुग्णांची नावे सारखीच असल्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येते. या सर्व प्रकारात संबंधित व्यक्ती मृत झाल्याचे कळवल्यामुळे बसलेला धक्का, नंतर प्लास्टिकमध्ये गुंडाळून दिलेल्या मृतदेहाची बेळगाव ते अथनी अशी ने-आण आणि जिवंत व्यक्ती मृत दाखवल्याने झालेला मनस्ताप या साऱ्यांमुळे या रुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.